हा माझा मार्ग एकला
हा माझा मार्ग एकला. ——————————————————————————— माझे आईवडील पापभिरू, अतिशय सश्रद्ध आणि धार्मिक रितीरिवाज पाळणारे असल्याने, डॉ दाभोळकर किव्वा श्याम मानव सारख्या लोकांपासून आम्ही चार हात दूरच राहिलो. आजूबाजूचा समाज आणि बरीचशी मित्रमंडळी सुद्धा "ठेविले अनंते तैसेची राहावे" आणि टिपिकल मध्यमवर्गीय मराठमोळी संस्कृती. माझ्यावर त्याच संस्काराचा पगडा अगदी आताआतापर्यंत म्हणजे वयाच्या तिशी-पस्तिशी पर्यंत होता. मनामध्ये अनेक शंका-कल्लोळ असत. गाईचे रक्षण करूनच आपण का देवाच्या जवळ जातो, कुत्र्याचे का नाही? सवाष्ण म्हणून ब्राह्मण स्त्रीयांना ब्राह्मण स्त्रीच का पाहिजे, उत्तम आर्थिक स्थितीत असलेले नवरा - बायको यांना मेहुण म्हणून घरी बोलवून आपला नक्की असा पुण्याचा कोणता संचय होतो. फलज्योतिष, हस्तसामुद्रिक, वास्तुशास्त्र, बाबा लोक आणि इतर बरेच तयार केलेले Pseudosciences मध्ये आढळणारे प्रकार, त्यावर भाबडेपणाने ठेवलेल्या श्रद्धेमुळे लोकांची झालेली दुर्दशा आणि फसगत जागोजागी दिसत असे. त्या शास्त्रांमधील फोलपणा किव्वा सातत्याचा अभाव आणि त्यांची विज्ञानाशी सांगड घालण्यात केलेले हताश प्रयत्न यामुळे...